अभिनेता गौरव घाटणेकर आता डॉक्टर बनणार?

 

हल्ली कुटुंबासोबत  तरुणांनाही  आवडेल अशा उत्तम  मराठी चित्रपटांची निर्मिती होत आहे आणि लवकरच आता या चित्रपटांच्या यादीत एका नव्या चित्रपटाची भर पडणार आहे. 'लॅन्डमार्क फिल्म्स' ही चित्रपट निर्मिती करणारी कंपनी असाच एक दमदार आणि चवदार चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, ज्याचे नाव आहे 'वजनदार'.

११ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मराठीतील आजच्या सर्वात आघाडीच्या आणि ग्लॅमरस अभिनेत्री  सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. ह्याशिवाय ह्या चित्रपटात चॉकलेट बॉय  सिद्धार्थ चांदेकर एका महत्वाच्या भूमिकेत आहे. त्याशिवाय समीर धर्माधिकारी सारखा अनुभवी कलाकार व माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील, चेतन चिटणीस या चित्रपटात आहेत.  त्यामुळे आशयविषयासह खुसखुशीत मनोरंजन प्रेक्षकांना अनुभवता येईल.

या चित्रपटात अजून एक हॅंडसम कलाकार म्हणजे गौरव घाटणेकर हा  तुम्हाला पाहुणा कलाकराच्या रूपात पाहायला मिळणार आहे. गौरवने या सिनेमात ‘डॉक्टर’ची भूमिका साकारली आहे. या अगोदर त्याने ‘तुझविन सख्या रे’ आणि अनेक मालिका, मराठी चित्रपट आणि इंग्रजी नाटकांतून सगळ्या तरूणाईंवर अधिराज्य केलं आहे. गौरवच्या कामात तर शंकाच नाही म्हणून ‘वजनदार’ चित्रपटात त्याने साकारलेल्या ‘डॉक्टर’च्या वजनदार परफॉर्मन्सने तो पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना खूष करणार हे मात्र नक्की.

सिनेमात इतकी मोठी तगडी मांदियाळी, फ्रेश कलरफूल लूक त्यात दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांची मेजवानी म्हणजे सिनेमाला चार चांद लागले असं म्हणायला हरकत नाही. काय मग ११ नोव्हेंबरला सिनेमागृहात जाणार ना...?