वैभव-पूजामुळे सोनूला एक गाणं दोन वेळा का गावं लागलं?

 

अचूक आणि उत्तम गायकीसाठी सोनू निगम प्रसिद्ध आहे. अनेक गाणी त्यानं वन टेक गायली आहेत.  पण ‘चीटर’ या चित्रपटात नेमकं असं काय झालं ज्यामुळे सोनू निगमला एक गाणं दोन वेळा गावं लागलं? याला जबाबदार कोण वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत का?

आम्ही तुम्हांला सांगतो नेमके काय झाले ते-

संगीतकार अभिजीत  नार्वेकरनं ‘चीटर’ या चित्रपटासाठी चार गाणी संगीतबद्ध केली. त्यातली दोन गाणी सोनू निगमनं गायली आहेत. त्यापैकी ‘मन माझे...’ हे गाणं सोनूच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं. त्यानंतर चित्रपटाचं चित्रीकरण झालं. काही काळानं साऊंड आयडियाज या स्टुडियोमध्ये  सोनू निगम आणि चीटर चित्रपटाचे दिग्दर्शक फणसेकर यांची भेट झाली. त्यावेळी सोनूनं चीटरच्या गाण्यांच्या चित्रीकरणाविषयी विचारलं. फणसेकर यांनी गाणी तयार झाल्याचं सांगितलं. सोनूनं गाणी पहाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी सोनूला गाण्याचं चित्रीकरण दाखवलं. त्यातलं "मन माझे..." हे गाणं पाहून सोनूनं आधी रेकॉर्ड केलेलं गाणं रद्द करायला सांगितलं. सोनूनं गायलेल्या गाण्यावर वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांनी फारच उत्तम अभिनय केला होता. त्यांच्या अभिनयाच्या तोडीचं गाणं आपण गायलेलो नाही, असं सोनूला वाटलं. म्हणून त्यानं ते फायनल झालेलं गाणं रद्द करायला लावलं. संगीतकार अभिजित नार्वेकरला सांगून लगेच रेकॉर्डिंग करायला सांगितलं. पुढच्या काही वेळात सोनूनं हे गाणं पुन्हा गाऊन रेकॉर्ड करण्यात आलं.


आपल्यामुळे सोनू निगम पुन्हा गाणं गायल्याचा किस्सा वैभव आणि पूजाला कळल्यावर दोघंही भारावून गेले. 'सोनू निगम यांनी आमच्या अभिनयाचं कौतुक करून गायलेलं गाणं पुन्हा गाणं हा आमचा सन्मान आहे. एका कलाकारानं दुसऱ्या कलाकाराचं अशा पद्धतीनं कौतुक करणं फारच आनंददायी आहे,' अशी भावना वैभव आणि पूजाने व्यक्त केली.


"चीटर" हा आगळा वेगळ्या धाटणीचा सिनेमा येत्या १० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.