‘नटसम्राट’ येणार हिंदीत, बिग बी आणि नाना दिसतील एकत्र

 

‘नटसम्राट’ या नाना पाटेकरांच्या अभिनयाने सजलेली सिनेकलाकृती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. अल्पावधीतच या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतंच सक्सेस पार्टीत ‘नटसम्राट’ हा सिनेमा हिंदीत बनवण्याची इच्छा व्यक्त केली.

बॉलिवूड शहनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांना मराठी सिनेमांचं नेहमीच कौतुक वाटतं. मग ‘नटसम्राट’ याला अपवाद कसा असेल. महत्त्वाचं म्हणजे या हिंदी सिनेमात बिग बी अप्पासाहेब बेलवलकरांच्या मित्राच्या म्हणजेच विक्रम गोखलेंनी साकारलेल्या भूमिकेत दिसणार असल्याचं समजतंय. ‘नटसम्राट’ प्रदर्शित होण्यापूर्वीच  सिनेमाचा ट्रेलर पाहून बिग बींनी ट्विटरवरून “नाना पाटेकरांचा सशक्त अभिनय आणि महेश मांजरेकरांचं उत्कृष्ट दिग्दर्शन सिनेमाला लाभलं आहे”, असं कौतुक केलं होतं. त्यामुळे आता नाना पाटेकर आणि बिग बीं या दोन दिग्गजांना  एकत्र पाहायला सारेच उत्सुक आहेत.