कॅनेडियन पॉलाची मराठी शिकण्यासाठी खास मेहनत

 

मराठी भाषा किती गोड आहे हे परत एकदा सिद्ध झालंय मुळची कॅनडीयन असलेल्या ‘पॉलामॅकग्लिन’ हिच्यामुळे.  “पिंडदान” या आगामी मराठी चित्रपटामध्ये सिद्धार्थ चांदेकर, मनवा नाईक आणि पॉलामॅकग्लिन  झळकणार आहे. मराठीमध्ये परदेशी कलाकारांची एन्ट्री नवी नाही. पण मुळात परदेशी कलाकारांच्या अशा प्रमुख भूमिकेत काम करण्याने मराठीसृष्टीत एक नवं चैतन्य लाभलं आहे. यासाठी हे परदेशी कलाकारसुद्धा तितकीच मेहनत ही घेताना दिसत आहेत.

 पॉला ही मुळची कॅनडीयन असून तिने मराठी भाषा शिकण्यासाठी मेहनत देखील घेतली. देवनागरी भाषेतील उच्चार स्पष्ट व्हावे यासाठी तिने गायत्री मंत्राचा जप सुरु केला. फक्त गायत्री मंत्राचा जप न करता त्या मागचा अर्थ ही तिने जाणून घेतला.

पॉलाच्या भूमिकेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ, “या चित्रपटात अॅना नावाच्या ब्रिटीश मुलीची व्यक्तिरेखा पॉलाने साकारली आहे. जी काही कारणानिमित्त महाराष्ट्रात येथे आणि इकडचीच होऊन जाते. तिला हा देश आणि येथील संस्कृती याची उत्सुकता लागलेली असते त्यामुळे भारतात आल्यावर ती सर्व रूढी आणि परंपरा शिकते.”

‘कोणतीही गोष्ट शिकताना त्या मागील अर्थ मी आधी जाणून घेते मगच ती आत्मसात  करायला मला सोपी जाते. अभिनय करता करता मला कधी ही संस्कृती आपलीशी वाटू लागली हे माझ मला देखील कळल नाही.  संवाद बोलताना शब्दांचे उच्चार कसे असावेत याबद्दलच मार्गदर्शन मला वेळोवेळी माझ्या दिग्दर्शकांकडून, मित्रांकडून आणि सह-कलाकरांकडून मिळत गेलं. त्यांच्या मदतीमुळेच मी कॅमेरासमोर न डगमगता संवाद बोलू शकले.  तसेच दिग्दर्शक बंटी प्रशांत यांच्याबरोबरच सिद्धार्थ चांदेकर, मनवा नाईक अशा कलाकारांसह काम करण्याचा अनुभव फारच धमाल होता. परदेशी कलाकारांना हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषांतील चित्रपटांत महत्त्वाची भूमिका सहसा मिळत नाही. गाण्यात नाचण्यासाठी किंवा छोट्या भूमिकांसाठी परदेशी  कलाकार घेतले जातात. मात्र, पिंडदानसारख्या अप्रतिम चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारायला  मिळणं माझ्यासाठी फारच मोठी गोष्ट आहे”,  असं पॉलाने सांगितलं.