जावेद जाफरीचं ‘युथ’ साठी मराठमोळं रॅपसॉंग

 

नृत्यकौशल्याच्या व अभिनयाच्या अचूक टायमिंगने रसिकांना मनोरंजनाचा आनंद देणारे अभिनेता जावेद जाफरी आता मराठमोळं रॅपसॉंग गात आजच्या तरुणाईला बदल घडवायची जाणीव करून देणार आहेत. ‘युथ’ या आगामी मराठी चित्रपटासाठी हे रॅपसॉंग त्यांनी गायलं आहे.

या मराठमोळ्या रॅपसॉंगला दिलेला हिंग्लिश शब्दांचा तडका यामुळे हे रॅपसॉंग अधिकच परिणामकारक झालं आहे. ‘बंद कर राग डोक्यात गेली आग’ असे बोल असलेल्या या रॅपसॉंगमधून आजची राजकीय परिस्थिती दर्शवत तरुणाईला बदल घडवायची जाणीव करून दिली आहे. जावेद जाफरी यांनी मराठीत गायलेलं हे पहिलंच मराठमोळं रॅपसॉंग आहे.

“आपली आजची परिस्थिती ही खरंच विचार करायला लावणारी आहे. आजच्या तरुणाईने विचार करत ही परिस्थिती बदलावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. या रॅपसॉंगच्या माध्यमातून हा विचार तरुणाईपर्यंत पोहचवता येणार असल्याने या  रॅपसॉंगला मी होकार दिला”, असे जावेद जाफरी यांनी सांगितले.

विशाल-जगदीश यांनी शब्दबद्ध केलेल्या या रॅपसॉंगला त्यांचच संगीत लाभलं आहे. व्हिक्टरी फिल्म्स प्रस्तुत, सुंदर सेतुरामन निर्मित ‘युथ’ राकेश  कुडाळकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.  नेहा महाजन, अक्षय वाघमारे, मीरा जोशी, अक्षय म्हात्रे, केतकी कुलकर्णी, शशांक जाधव, विक्रम गोखले, सतीश पुळेकर या कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

या आगामी चित्रपटात तरुणाईचा सळसळता उत्साह, उत्स्फूर्तता पाहता येणार आहे. तरुणाईचा बदलता दृष्टीकोन ‘युथ’ सिनेमामधून २० मे ला  पाहता येणार आहे.