‘चिमणी चिमणी’ ला स्वप्नील जोशीचा आवाज

 

पडद्यावर दिसणा-या आपल्या लाडक्या कलाकारांचे आवाजही आता प्रेक्षकांना भुरळ पाडत आहे.  भन्साळी प्रॉडक्शनची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट ‘लाल इश्क़… गुपित आहे साक्षीला’ या रोमँटिक, ससपेन्स, थ्रिलर चित्रपटाची चर्चा तर आता सगळीकडेच होत आहे.  काही दिवसांपूर्वी ‘चांद मातला’ हे  स्वप्नील जोशी आणि अंजना सुखानीवर चित्रित झालेलं रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं होतं आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. ‘चांद मातला’ या रोमँटीक गाण्यानंतर आता वेळ आली आहे ‘लाल इश्क़… गुपित आहे साक्षीला’ या चित्रपटातील दुसरे गाणं ऐकण्याची.

या चित्रपटाचं अमितराज यांचं संगीत असलेलं आणि आदर्श शिंदेच्या आवाजातलं ‘चिमणी चिमणी’ हे दुसरं गाणं नुकतच प्रदर्शित झालं.  या गाण्यातली विशेषता म्हणजे स्वप्नील जोशीचा पण आवाज या गाण्यातून ऐकायला मिळणार आहे.  इतकेच नव्हे तर चित्रपटातील सर्वच कलाकार पियुष रानडे, स्नेहा चव्हाण, आरती केळकर, जयवंत वाडकर, कस्तुरी वावरे या सर्वांचा तसेच अमितराजच्या पण आवाजात हे गाणं आहे.  ‘चिमणी चिमणी’ या गाण्याचे बोल सचिन पाठकने लिहिले आहे. हे गाणं एकाच शॉटमध्ये चित्रित करण्यात आले आहे, तर अर्थात सर्व कलाकारांनी घेतलेल्या या मेहनतीला प्रेक्षक नक्कीच दाद देतील.

या कार्यक्रमा दरम्यान मिडीयाने ‘चिमणी चिमणी’ या गाण्याशी संबंधित अमितराज, निलेश मोहरिर, आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, स्वप्नील जोशी व  ‘लाल इश्क़… गुपित आहे साक्षीला’  च्या टीमशी संवाद साधला.  ‘चिमणी चिमणी’ या गाण्याचा टिझर पाहा... पूर्ण व्हिडीयोसाठी तुम्हांला थोडीशी वाट पाहावी लागेल. पण वाट बघितल्याचा परिणाम नक्कीच गोड असेल कारण ‘चिमणी चिमणी’  हे गाणंच इतकं धमाल आहे की नक्कीच आवडेल.

 भन्साळी प्रॉडक्शन या बॅनरखाली संजय लीला भन्साळी यांची निर्मिती आणि शबीना खान यांची सहनिर्मिती असलेला ‘लाल इश्क़… गुपित आहे साक्षीला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केलं असून शिरीष लाटकर यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.  या सिनेमात मिलिंद गवळी, प्रिया बेर्डे, स्नेहा चव्हाण, पियुष रानडे, समिधा गुरु, कमलेश सावंत, जयवंत वाडकर, यशश्री मसुरकर  या कलाकारांच्याही  भूमिका  पाहता येणार आहेत. येत्या २७ मे 'लाल इश्क़' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.