‘युथ’ का पाहावा याची ५ कारणे जाणून घ्या

 

हल्ली सामाजिक विषयावर अनेक चित्रपट येत आहेत आणि समाजप्रबोधनासाठी चित्रपटांची मदत पण होत आहे. असाच सामाजिक विषय हाताळण्यात आला आहे ‘युथ’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये. विक्टरी फिल्म्स प्रस्तुत, सुंदर सेतुरामन निर्मित आणि राकेश कुडाळकर दिग्दर्शित ‘युथ’ हा चित्रपट २० मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट का पाहावा याची पाच कारणे खास मराठी धमाल डॉट कॉम सांगत आहे.

1. पाणी टंचाई हा सामाजिक विषय –

राकेश कुडाळकर दिग्दर्शित ‘युथ’ या चित्रपटात पाणी टंचाई हा सामाजिक विषय हाताळण्यात आला आहे. पाण्याच्या समस्या, त्याचा होणारा गैरवापर या समस्यांवर युथ या चित्रपटाने नजर टाकून समाजाला त्यातून एक संदेश, भावना देण्याचा प्रयत्न केला आहे.

2. तरुणाईवर आधारित-

हल्ली तरुणाईंवर आधारित अनेक चित्रपट येतात. पण युथ हा जरा वेगळा आहे. यामध्ये तरुणांचा फोकस सामाजिक समस्यांवर जास्त दाखविला आहे. आताचा तरुण वर्ग या पाण्याच्या समस्याकडे कोणत्या उद्देशाने बघतो व त्यावर कोणता तोडगा काढतो हे या चित्रपटात दाखविले आहे.

3. जावेद जाफरीचे मराठी रॅपसाँग, स्वानंद किरकिरे यांचं भारुड आणि अरमान मलिकचं मराठी गाणं

धमाल आणि कमाल अशी जी व्यक्ती आहे ती म्हणजे जावेद जाफरी. हुशार आणि विनोदी कलाकार, अँकर अशी ओळख असलेल्या जावेद जाफरीने युथ चित्रपटासाठी मराठी रॅप साँग गायले आहे आणि आता रॅपर म्हणून पण जावेद जाफरीला ओळखतील. “बंद कर राग, डोक्यात गेला आग” हे जावेद जाफरीचं रॅपसाँग युथचे आकर्षण बनले आहे.

गीतलेखक, गायक, अभिनेता आणि दिग्दर्शक स्वानंद किरकिरे यांनी या चित्रपटात “पाणी हरवलं, कोणी ते चोरलं” हे भारुड गायलं आहे. यांचं हे भारुड प्रत्येक व्यक्तीला पाण्याचा विचार केल्याशिवाय सोडणार नाही.  एक वेगळीच बदल घडवायची ऊर्जा या भारुडातून मिळते.​​ ​

मैं हू हिरो तेरा’ फेम बॉलिवूड गायक अरमान मलिक याचं पण मराठी गाणं या चित्रपटाचं आकर्षण बनलं आहे.  ‘जे होते मला, होते का तुला?’ हे गाणं त्याने गायलं असून युथचा त्याला प्रतिसाद सकारात्मक मिळाला आहे. 

4. ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले, सतिश पुळेकर यांचा भक्कम अभिनय-

तरुण कलाकारांसह विक्रम गोखले आणि सतिश पुळेकर यांचा भक्कम आणि दमदार अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

5. वास्तवदर्शी पध्दतीने चित्रपटाचं शूट-

या चित्रपटाचं वास्तवदर्शी पध्दतीने शूट करण्यात आलं आहे. या चित्रपटातील दृश्य कृत्रिम नसून ख-या माणसांची आणि ठिकाणावरची वाटतात.