किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी मध्ये क्रांतीची स्टंटबाजी

 

आतापर्यंत सगळ्या चित्रपटांत क्रांती रेडकरने तिच्या वेगवेगळ्या भूमिकेतून तिची छाप उमटवली आहे. आता क्रांतीला स्टंटबाजी करताना पाहून आपल्याला एक डॅशिंग फिलिंग नक्कीच येणार आहे. येत्या २० मे ला प्रदर्शित होणाऱ्या किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी या मराठी चित्रपटात तिच्या अभिनयाची वेगळीच ‘क्रांती’ आपल्याला पहायला मिळणार आहे.

क्रांतीने नेमके असे कोणते स्टंट केले हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असालच. या चित्रपटात क्रांतीने चक्क ट्रक चालवला आहे. एवढंच नाही विहिरीत पोहणं असो की पॅराग्लायडिंग या स्टंटचाही रोमांचकारी अनुभव तिने यामध्ये घेतला आहे. तसेच सापासोबतच एक थरारक दृश्यही तिने यात साकारलं आहे. या सर्व स्टंट्ससाठी क्रांतीने रीतसर ट्रेनिंग घेतलं होतं आणि त्याचं टेक्निक जाणून घेत हे स्टंटस् केले. ताप असतानाही विहिरीत पोहण्याचा सीन क्रांतीने जिद्दीने पूर्ण करत कलेप्रती असलेली बांधिलकीच जपली.

स्टंटबाजी करतानाची क्रांती आपल्या स्टंट्सविषयी सांगते, “हे स्टंट करणे माझ्यासाठीही तितकेच रोमांचकारी असल्याचं सांगत किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी हा चित्रपट माझ्यासाठी वेगळा अनुभव असल्याचं क्रांती आवर्जून सांगते.”

किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी  या सिनेमाचा कथाविस्तार व दिग्दर्शन कांचन अधिकारी यांचं आहे. लेखन आशिष पाथरे यांनी केले असून छायांकन सुरेश देशमाने यांनी केले आहे आणि संकलन आनंद दिवान यांचं आहे.  कांचन अधिकारी व ओम गहलोट निर्मित व पियुष गुप्ता सहनिर्मित या चित्रपटात सुबोध भावे आणि क्रांती रेडकर प्रमुख भूमिकेत आहे आणि त्यांच्यासोबत मोहन जोशी, अविष्कार दारव्हेकर, प्रिया मराठे, नम्रता आवटे, माधवी गोगटे, धनंजय मांजरेकर, अमित कल्याणकर व बालकलाकार उर्मिका गोडबोले यांच्या देखील खास भूमिका आहेत. २० मे ला किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.