केदार शिंदे-भरत जाधव यांचे आणखी एक मराठी दमदार नाटक

 

‘सेल्फी’, ‘गेला उडत’, ‘मास्तर ब्लास्टर’ या दमदार नाटकांच्या यादीत नव्याने एका नाटकाची भर पडणार आहे. सुरुवातीला ‘सेल्फी’, ‘गेला उडत’, ‘मास्तर ब्लास्टर’ या नाटकाचे नाव घेण्यामागे एक विशेष कारण आहे. ते विशेष कारण म्हणजे ‘अजित भुरे, केदार शिंदे आणि भरत जाधव’.

‘सेल्फी’ नाटकाचे दिग्दर्शक अजित भुरे, ‘गेला उडत’चे दिग्दर्शक केदार शिंदे आणि ‘मास्तर ब्लास्टर’ नाटकामध्ये प्रमुख भूमिका साकारणारे भरत जाधव या तिघांनी मिळून प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे ठरवले आहे. या वाक्यामागे पण एक कारण दडलंय. अजित भुरे, केदार शिंदे आणि भरत जाधव लवकरच रंगभूमीवर एक नवं कोरं नाटक सादर करणार आहेत.

या नव्या-को-या नाटकाचं नाव आहे ‘सौजन्याची ऐशीतैशी’.  चंद्रलेखा प्रकाशित आणि वसंत सबनीस लिखित ‘सौजन्याची ऐशीतैशी’ या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी केदार शिंदे यांनी पेलली आहे. अभिनेते भरत जाधव यांची या नाटकामध्ये प्रमुख भूमिका आहे. अमेय खोपकर आणि जितेंद्र ठाकरे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.

‘सौजन्याची ऐशीतैशी’ या नाटकाच्या नावावरुन आणि पोस्टरवरुन प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. आकर्षक नाव आणि पोस्टर यामुळे प्रेक्षकांनी अगोदरच या नाटकाला पसंती कळवली असेल. ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकातील दिग्दर्शक-अभिनेता जोडी म्हणजेच रसिकांचा राजा भरत जाधव आणि सर्वांचे आवडते दिग्दर्शक केदार शिंदे ही जोडी एकत्र आली म्हणजे प्रेक्षकांचे मनोरंजन हमखास होणार. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग केव्हा आहे आणि कुठे आहे याविषयी लवकरच कळेल. तोपर्यंत या सुंदर कलाकृतीची प्रतिक्षा करुयात.

http://www.marathidhamaal.com/  तर्फे ‘सौजन्याची ऐशीतैशी’ या नाटकाच्या संपूर्ण टिमला अनेक शुभेच्छा!