रिव्ह्यू: रटाळ प्रेमकथेचा ‘मि. अॅण्ड मिसेस सदाचारी’

 


बॉलिवूड सिनेमांसारखी स्टाईल मराठी सिनेमांमध्ये आता नवीन राहीलेली नाही. प्रेमकथा, कौटुंबिक ड्रामा आणि व्हिलनगिरी या पारंपारिक मुद्द्यांभोवती नुकत्याच झळकलेल्या ‘मि. अॅण्ड मिसेस सदाचारी’सिनेमा बेतला आहे.

कोल्हापुरातल्या एका रांगड्या तरूणाभोवती सिनेमाची कथा उलगडते. कोल्हापुरात राहणारे शिवा आणि जिवा हे दोन भाऊ. आपल्या त्यांचे पालकांसोबतचे कौटुंबिक कलह, तसंच शिवाजी महाराजांवर असलेली शिवाची निस्सीम भक्ती आणि प्रेयसी गार्गीचं प्रेम मिळविण्यासाठीची धडपड सिनेमात पाहायला मिळते. आज आपल्या प्रेयसीला इंम्प्रेस करण्यासाठी जे जे करता येईल, ते सिनेमात अनुभवता येतं.

दिग्दर्शकाने सिनेमात फक्त प्रेमकथा आणि त्याला सजविण्यासाठी नेहमीच्याच रटाळ ड्रामाचा उपयोग केला आहे. कथा फुलवायला वाव होता. पण पडद्यावर तो प्रयत्नच दिसून आला नाही. नेहमीसारखाच दोन प्रेमी जीवांच्या समोर उभा ठाकणारा व्हिलन आणि त्याभोवती फिरणारी कथा इतकंच अनुभवता येतं. सिनेमा पाहताना उत्सुकता लागून राहत नाही. पुढे काय घडणार याची आधीच कल्पना येते. 

अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची केमिस्ट्री सर्वोत्तम जुळलीय. मोहन जोशी, सुमुखी पेंडसे, विजय आंदळकर, उमा सरदेशमुख, उदय नेने, प्रसाद जवादे आदी सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. संगीत ही या सिनेमाची जमेची बाजू म्हणावी लागेल. सर्वच गाणी छान आहेत. 

नायक-नायिकेच्या प्रेमाआड येणारा खलनायक अशी नेहमीचीच रटाळ प्रेमकथा आणि त्याला कौटुंबिक, अॅक्शन ड्रामाची जोड असलेला हा सिनेमा तितका आपल्यावर प्रभाव टाकत नाही.