बघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत??

 

रसिका सुनील सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनायाची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेने तिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवून दिले. या मालिकेमुळे तिला पैसा, प्रसिद्धी सगळे काही मिळवून दिले आहे आणि त्याचमुळे नुकतीच रसिका सुनीलने तिच्या आयुष्यातील पहिली कार घेतली आहे. रसिका सुनीलनेच तिच्या या गाडीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या फॅन्सना ही गुड न्यूज सांगितली आहे. या फोटोमध्ये आपल्याला रसिकाची नवी कोरी गाडी पाहायला मिळत आहे.

रसिका या फोटोमध्ये खूपच खूश दिसत असून तिने विविध पोजमध्ये फोटो काढत हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने पांढऱ्या रंगाची क्रेटा गाडी घेतली असून या फोटोंसोबतच तिने एक पोस्ट देखील लिहिली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, ‘अरे आली रे... तुमच्यासोबत शेअर करायला मला खूप आनंद होत आहे की, मी माझ्या आयुष्यातील पहिली कार घेतली आहे. माझी पहिली कार ही क्रेटा असून मी खूपच खूश आहे. मी या कारसाठी माझ्या बाबांचे मनापासून आभार मानत आहे.’


माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत बिनधास्त, धम्माल मस्ती आणि जीवनाचा फुल ऑन आनंद घेणारी शनाया रसिकांना भावते. या मालिकेत शनायाच्या भूमिकेसाठी आधी शर्मिला राजारामला विचारण्यात आले होते. पण तिने या भूमिकेसाठी नकार दिल्याने या भूमिकेसाठी रसिकाची निवड करण्यात आली.माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालली आहे. मालिकेचे कथानक, त्यात दिवसागणिक येणारे ट्विस्ट रसिकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. विशेषतः राधिका-शनायाची जुगलबंदी आणि दोघींमध्ये अडकलेल्या गुरुनाथची होणारी फजिती यामुळे छोट्या पडद्यावरील हिट मालिकांमध्ये माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचा समावेश झाला आहे.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत रसिका सुनीलसोबत अभिजीत खांडेकर, अनिता दाते केळकर, शर्मिला राजाराम, अरुण नलावडे, श्वेता मेहेंदळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही मालिका सध्या टिआरपीच्या रेसमध्ये देखील अव्वल आहे.