मराठी चित्रपटासाठी विवेक आणि सलमान येणार का आमने-सामने?

 

मराठी सिनेसृष्टीत सध्या हवा आहे ती रितेश देशमुखच्या मराठी चित्रपटाची. रितेश देशमुख मराठी चित्रपट करणार आहे हे तर आम्ही तुम्हांला सांगितलेच होते, पण रितेशच्या या चित्रपटात आपल्याला बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पाहायला मिळणार आहे हे सुद्धा तुम्हांला सांगितले आहे. पण आता नुसता सलमान खान नाही तर विवेक ऑबेरॉय सुद्धा पहिल्यांदाच मराठमोळ्या अंदाजात तुम्हांला पाहायला मिळणार आहे.

रितेश देशमुखच्या आगामी चित्रपटातील सलमानची भूमिका ब-यांपैकी  लांबीची असल्याचे कळते आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विवेक आणि सल्लु भाईचा आमना-सामना लवकरच होऊ शकतो.  सलमान आणि विवेक  यांच्यामधील वाद तर सगळ्यांनाचा माहित आहे. विवेकने सलमानची अनेक वेळा माफी मागण्याचाही प्रयत्न केला.  परंतू आता रितेशच्या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे एकत्र काम करणार आहेत आणि लवकरच सलमान खान मराठी बोलताना पण पाहायला मिळणार आहे.

या आधी सलमानने रितेशच्या ‘लय भारी’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यामध्ये सलमान छोटा पण जबरदस्त डायलॉग बोलला होता. सलमान उत्कृष्ट मराठी बोलतो हे सर्वांनाच माहित आहे आता रितेशच्या ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटात सलमानची भूमिका काय असेल याचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. पण मराठी चित्रपट करण्याची सलमानची इच्छा पूर्ण होणार हे मात्र खरंय.

बॉलिवूडमध्ये कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमवणारा सलमान जर मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसला तर त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होईल. विवेक ओबेरॉय आणि सलमान खान एकत्र येणार का, याची चर्चा जरी होत असली तरी ठामपणे अजून काही सांगण्यात आलेले नाही. ते दोघे मराठी चित्रपटात एकत्र काम करणार की नाही हे लवकरच आपल्याला समजेल.