EXCLUSIVE: मराठी सिनेमांना ‘टी-सिरिज’चा पाठिंबा

 

आपल्या सर्वांना ठाऊक आहे की मराठी सिनेनाट्यसृष्टी त्यांच्या उत्तम कथानक, कलाकारांची निवड, पार्श्वसंगीत आदी गोष्टींमुळे इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील कलाकार, निर्माते यांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेत आहे. सर्वत्र मराठीसृष्टीचं कौतुक होत असताना आणखी एक अभिमानास्पद मराठी सिनेसृष्टीच्या बाबतीत घडली आहे. आज तुम्हां सर्वांना एक खास बातमी या लेखाच्या माध्यमातून मिळणार आहे.

युट्यूब चॅनेलमध्ये अग्रेसर असलेली टी सिरीज म्युझिक कंपनी आता मराठी सिनेमांकडे झेप घेत आहे. जगातील नंबर 1 युट्यूब चॅनेल म्हणून टी सिरीज या म्युझिक कंपनीला ओळखले जाते. नुकतेच टी सिरिजला गुगलकडून डायमंड बटन ट्रॉफी हा पुरस्कार मिळाला.  मराठीत खूप चांगले चांगले विषय हाताळले जात असल्यामुळे आता टी सिरिज सुद्धा मराठी सिनेमांकडे पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी टी सिरिजने सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या भक्तिगीतांसाठी काम केले होते.

टी सिरिजचे अध्यक्ष भूषण कुमार आणि विनोद भानूशाली यांनी नुकताच मराठी सिनेसृष्टीमधल्या दिग्गज निर्माता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांबरोबर म्युझिक डीलचा एक महत्त्वपूर्ण करार केला आहे. काळानुसार आता मराठी सिनेसृष्टी पुढे सरसावली आहे, मराठीला चांगले दिवस आले आहेत आणि असे असताना सिनेमांची निर्मिती, त्यांच प्रमोशन्स आणि संगीत उत्तमरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहचावं म्हणून १५  ते २० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.

या करारअंतर्गत १० मराठी सिनेमांच्या संगीताला टी सिरिजकडून पाठिंबा देण्यात येणार आहे. ‘ध्यानीमनी’, ‘नेशन फर्स्ट’, ‘वाडा’, ‘टेक केअर गुड नाईट’, ‘शिकारी’, ‘शिवाजी पार्क मुंबई 28’, ‘आम अँम शिवाजी राजे’, ‘एफ यू’, ‘कोरेगाव पार्क’, ‘व्हाइट’ या एकूण १० मराठी सिनेमांचे म्युझिक पार्टनर टी सिरिज आहेत.

टी सिरिजचे अध्यक्ष विनोद भानुशाली  www.marathidhamaal.com शी बोलताना सांगतात, “मराठीत आम्ही या अगोदर देखील काम केले आहे. मराठीत प्रचंड सिनेमे येत असल्यामुळे आम्ही आता मराठीत पाऊल टाकत आहोत. सिनेमा अजून जास्त चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर यावा म्हणून त्यासाठी चांगली धोरणे करण्यात येणार आहे. या सगळ्यासाठी मराठीतील न्यूज चॅनेलला, मनोरंजन चॅनेलला वेगळ्या पद्धतीने उपयोग करता येईल. तसेच मराठीतील जुन्या गाण्यांना थोडं रिव्यॅंप करून पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येणार आहे. पहिल्यांदाच मराठीत एकावेळी १० सिनेमांच म्युझिक टी सिरिज या म्युझिक कंपनीने खरेदी केले आहे. हिंदीत जसे सिंगल म्युझिक अल्बम आम्ही काढले आहेत तसेच मराठीत देखील काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मराठीत हा अनोखा करार फार महत्त्वाचा समजला जात असून, तो मराठी सिनेसृष्टीसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल हे नक्की.”

भूषण कुमार म्हणाले, “टी-सिरीजतर्फे आम्ही हा एक करार केला आहे आणि महेश मांजरेकरांसोबत हा करार करण्यात आला याचा आनंद वाटतोय. गेली अनेक वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. मला अशी आशा आहे की हिंदी, पंजाबी आणि भोजपूरी चित्रपटांसारखे निखळ प्रेम आम्हांला मराठीकडून पण मिळेल.”

महेश मांजरेकर म्हणतात, “टी-सिरीज मराठी चित्रपटांच्या संगीताला नक्की आवश्यक अशी गती देईल. माझ्या आगामी १० चित्रपटाचे टी-सिरीज म्युझिक पार्टनर असतील. भूषण कुमार आणि विनोद भानुशाली यांचे आभार.