Interview: दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांची ‘द सायलेंस’ चित्रपटाविषयीशी संबंधित मुलाखत

 

मराठी सिनेसृष्टीतील एक हुशार आणि गुणी दिग्दर्शक म्हणून गजेंद्र अहिरे हे नाव आग्राहानं घेतलं जातं. दिग्दर्शनाबरोबरच कथा-पटकथा-संवाद आणि गीतलेखन ही धुरा ते लिलया सांभाळतात. सिनेमा असो किंवा नाटक त्यांनी आपला ठसा उमटवलाय. सिनेमाचा विषय आणि त्यांनी पडद्यावर साकारलेली कलाकृती नेहमीच कौतुकास्पद ठरते. अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांच्या सिनेमांना आणि त्यांना गौरविण्यात येतं.

आपल्या भूतकाळात घडलेल्या घटनांचं ओझं संपूर्ण आयुष्यभर वाहणाऱ्या कैक चीनींचं मौन मोडणाऱ्या ‘द सायलेंस’ या चित्रपटाच्यानिमित्ताने गजेंद्र अहिरेंशी मारलेल्या खास गप्पा :

प्र. - तुमच्या चित्रपटाचं शीर्षक खूप वेगळं आहे. हा ‘द सायलेंस’ चित्रपट नेमका कशाशी निगडीत आहे?

उ. - हा चित्रपट त्या व्यक्तींशी निगडीत आहे ज्या अन्यायाविरूध्द आवाज न उठवता आपल्या आयुष्याचा गाडा ओढत राहतात. कुंपणात दडून असलेल्या या समाजातील एक व्यक्ती आपलं मौन मोडून या दुष्कृत्यांविरोधात उभी ठाकते आणि म्हणून या चित्रपटाचं नाव ‘द सायलेंस’ आहे.

प्र. - चित्रपटाचं चित्रीकरण बराच काळ आधी पूर्ण झालं, तरी चित्रपट प्रदर्शनासाठी एवढा अवकाश का?

उ. -  बऱ्याच राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाची निवड झाली. या चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कारांबरोबरच द सायलेंस ने प्रेक्षकांची मनं ही जिंकली. आपलं वेगळेपण जगभरात गाजवल्यानंतर आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

प्र. -  अंजली पाटील सोबत तुम्ही सैराट फेम नागराज मंजुळेंची प्रमुख भूमिकेसाठी निवड केलीत... या निवड प्रक्रियेबद्दल काय सांगाल?

उ. -  तो माझा जवळचा मित्र आहे. केवळ सैराट किंवा फँड्री चा दिग्दर्शक म्हणून नाही तर मला माझ्या चित्रपटासाठी एका प्रखर व्यक्तीमत्त्वाची गरज होती जे नागराजमध्ये मी पाहिलं आणि त्याची या चित्रपटासाठी आम्ही निवड केली. अंजली एक खूप प्रतिभावान अभिनेत्री आहे, तिला माझ्यासोबत काम करायची इच्छा होती आणि म्हणून तिची निवड झाली.

प्र. -  चित्रपटात संगीत किती मह्त्त्वाचं आहे?

उ. -  गाणी या चित्रपटात नाहीत पण सिनेमाची कथा पार्श्वसंगीतातून खुलून येते. या चित्रपटाला इंडियन ओशन बँडने संगीत दिलं आहे.

प्र. -  तुमच्या प्रत्येक चित्रपटात नेहमीच वेगळेपण जाणवतं... ते नेहमीच्या कथांपेक्षा वेगळे असतात... तुमच्याकडून हे ठरवून केलं जातं?

उ. -  मी एक कलात्मक व्यक्ती आहे. नेहमी होणाऱ्या सिनेमांपेक्षा काहीतरी वेगळं करून पाहण्यात मला नेहमीच रस आहे.

प्र. -  आगामी सिनेमांविषयी काय सांगाल?

उ. -   माझे कुलकणी चौकातला देशपांडे आणि ताच हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.