Exclusive: मल्टीस्टारर ‘बस स्टॉप’ चे टिझर पोस्टर प्रदर्शित

 

गणराज असोसिएट्स आणि सारथी ग्रुप प्रस्तुत, समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ‘बस स्टॉप’ या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती श्रेयस जाधव, पूनम शेंडे, गजेंद्र पाटील आणि आसू निहलानी यांनी केली आहे.

बिनछताच्या ‘निलांबरी’ बसमध्ये ‘बस स्टॉप’च्या संपूर्ण टीमने एकत्र येत चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित केले, एवढेच नव्हे तर या बसमधून मुंबईची धावती सफर देखील केली. एकतर ‘माय वे’ नाहीतर ‘हाय वे’ हा टिझर पोस्टरवरील स्लोगन आजच्या तरुणाईंची बिनधास्त विचारसरणी व्यक्त करण्यास पुरेसा ठरत आहे.

तसेच त्यावर अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील आणि अक्षय वाघमारे हे चेहरे दिसत असून त्यांच्या चित्राखाली बोल्ड, बीजी, रोमान्स, अपॉर्च्युनिटी, चान्स, ब्लफ, अफेअर हे तरुण पिढीतील जीवनशैली मांडणारे शब्द देखील पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा टिझर पोस्टर प्रथमदर्शनी पाहताना ‘बस स्टॉप’ हा चित्रपट आजच्या लाईफ स्टाईलवर भाष्य करतो, असा अंदाज येतो.

अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर, संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी या कलाकारांच्या अभिनयाने नटलेला ‘बस स्टॉप’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवाणी असणार आहे.

अभिजित अब्दे यांच्या कॅमे-यातून प्रेक्षकांनी या चित्रपटाचा आनंद घेता येईल आणि तरुण पिढीचे आवडते संगीतकार जसराज, हृषीकेश, सौरभ यांनी ताल धरायला लावणारं संगीत दिलंय.

मल्टीस्टारर असलेला ‘बस स्टॉप’ २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.