फर्जंद येतायेत ११ मे ला...

 

पिरीयड फिल्मच्या माध्यमातून इतिहासाच्या पानांत लुप्त झालेल्या अनेक महान व्यक्तिरेखांवर बेतलेले चित्रपट अलीकडच्या काळात आले आणि त्याला उदंड लोकश्रयही मिळाला. याच यादीत आणखी एका चित्रपटाचा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे. कोंडाजी फर्जंद हा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील ज्वलंत अध्याय आता मराठी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. शिवरायांच्या गड-किल्ल्यांवर पराक्रम गाजविलेल्या अनेक पराक्रमी योद्ध्यांपैकी कोंडाजी फर्जंद हे एक. कालौघात विस्मरणात गेलेल्या या योद्ध्याच्या पराक्रमाची यशोगाथा फर्जंद या चित्रपटाच्या रूपातून आपल्या समोर येणार आहे.

कोंडाजी फर्जंद आणि मावळ्यांनी किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती या धाडसाची गाथा,  दिग्पाल लांजेकर   दिग्दर्शित 'फर्जंद  या चित्रपटाद्वारे उलगडली जाणार असून आपणास पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. या सिनेमाची पहिली झलक नुकतीच इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली आहे. ११ मे २०१८ ला कोंडाजी फर्जंद प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अशा वीरांच्या चरित्रांमधून राष्ट्रीय चारित्र्य घडतं., म्हणून असे चित्रपट महत्त्वाचे आहेत’, असं सांगताना चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची इतिहासाबद्दलची जिज्ञासा आणि ज्ञान वाढविणारा फर्जंद हा शिवकालीन युद्धपट नवी ऐतिहासिक दृष्टी देणारा ठरेल असा विश्वास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केला.

‘स्वामी समर्थ मुव्हीज’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. अनिरबान सरकार, संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील  पोतदार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.