'गच्ची'वरून अभय – प्रियाच डिजिटल वॉर

 

'गच्ची'... म्हणजे वाढत्या शहरीकरणातील टुमदार इमारतीवर वसलेली एक निवांत जागा. या जागेत काही घटका शांत बसून, आयुष्याचा मार्ग चोखाळता येतो. म्हणूनच तर, सुख असो वा दुख, मानवी भावभावनांना वाट करून देणारी ही 'गच्ची' प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. हीच 'गच्ची' आता सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

लँडमार्क फिल्म्सच्या ‘विधी कासलीवाल’ प्रस्तुत आणि ‘नितीन वैद्य’ प्रोडक्शन निर्मित 'गच्ची' हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर एका हटके अंदाजात टीझर लाँच करण्यात आला. नचिकेत सामंत दिग्दर्शित या सिनेमातील मुख्य कलाकार अभय महाजन आणि प्रिया बापटच्या डिजिटल वॉरमधून,  'गच्ची' चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले. या टीझरमध्ये अभय आणि प्रिया दिसत असून, गच्चीवर घडणारा हा सिनेमा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. प्रियाचा एक वेगळा अंदाज यात पाहायला मिळतो. तसेच संपूर्ण सिनेमा याच दोघांवर आधारित असल्याची जाणीव हा टीझर पाहताना होते. या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाचे कुतूहल अधिक वाढलेले दिसून येत आहे. 

सध्या सिनेमाची जाहिरात हि सोशल मिडियाद्वारे वेगवेगळ्या कल्पनांद्वारे केली जाते. आणि मग त्या चित्रपटाला इतर अभिनेते अभिनेत्रींचा पाठींबा मिळतो. हा सध्याचा ट्रेण्ड ह्या चित्रपटात सुद्धा दिसून आला. प्रिया बापटची मैत्रीण सई ताम्हणकर आणि स्वप्नील जोशी ह्यांनी चित्रपटाला पाठींबा देत आपल्या सोशल मिडिया अकाऊट वर 'गच्ची' लिहून प्रिया सोबत डिनरचा प्लैन केला आहे.

योगेश विनायक जोशी लिखित गच्चीवरील ही गोष्ट नेमकी काय आहे, ही जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली  असेल, यात शंका नाही.