'रिंगण' साठी पुणेरी अभय महाजन बनला शिल्पकार

 

टी.व्ही.एफ या डिजिटल एंटरटेनमेंट चॅनल वरील सर्वात नावाजलेल्या वेबसिरीज ‘पिचर्स’ मधील ‘मंडल’ ही लोकप्रिय भूमिका ज्याने निभावली तो आपल्या सर्वांचा लाडका  मराठमोळा पुणेरी अभय महाजन पुन्हा एकदा लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित 'रिंगण' या आगामी मराठी चित्रपटाद्वारे आपल्या सर्वांच्या भेटीस येत आहे. 

इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे व सोशल मीडियाच्या सर्रास वापरामुळे वेब सिरीजची लोकप्रियता हळू-हळू वाढत असलेली दिसून येते आहे. सोशल मीडिया हे आपले विचार व्यक्त करण्याचे मुक्त साधन असल्याने टी.व्ही.एफ च्या ‘पिचर्स’ या वेब्सिरीजने सोशल मीडियावर धुमाकूळ गाजवला. त्यातील प्रत्येक कलाकार आजच्या युथच्या मना-मनात घर करून बसलेला आहे. 'मंडल' ही त्यातील थोडीशी विक्षिप्त भूमिका साकारून अभय महाजन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा एक भाग ठरला आहे.

हरिश्चंद्राची फॅक्टरी, डोह, रंगा-पतंगा यांसारख्या उत्तोमोत्तम चित्रपटात आपल्या अभिनयाचा परिचय करून दिल्या नंतर लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित 'रिंगण' हा अभय महाजनचा आगामी मराठी चित्रपट आहे.

रिंगण चित्रपटात अभय आपणांस 'निलेश' नामक शिल्पकाराची भूमिका साकारताना दिसून येतो. हातात शिल्पकलेची उत्कृष्ट जादू असलेला हा निलेश म्हणजे माणसांच्या वर्तणुकीचा अभ्यास करून त्यांना जाणून त्यांच्या कलाने घेणारा व त्यांना योग्य मार्ग दाखविणारा त्यांचा सोबती.

चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले असून छायाचित्रदिग्दर्शन अभिजित अब्दे यांनी केले आहे.  अजय गोगावले याने एका गाण्याला आवाज दिला आहे तर विधि कासलीवाल या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. 'रिंगण' येत्या ३० जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.