Review: प्रवासात फुललेली पण ताणलेली प्रेमकथा

 


आजवर प्रेम ही संकल्पना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने मांडत आला आहे. मग ते पहिल्या नजरेत होणारं प्रेम असेल वा प्रवासा दरम्यानचं. प्रेमाला कधीच उपमा नसते. एखादी व्यक्ती आपल्याला पहिल्या नजरेत आवडली तरी आपण तिच्या प्रेमात पडतो. प्रेम जरी आयुष्यात एकदाच होत असलं तरी एकाच व्यक्तीच्या पुन्हा नव्याने प्रेमात पडण्याची जादू काही औरच असते, म्हणूनच स्वरूप रीक्रिएशन अँड मिडीया प्रा. लिमिटेड प्रस्तुत, सचिन नारकर आणि गणेश पवार निर्मित तसेच चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘भेटली तू पुन्हा’ हा सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे.

ही कथा आलोक भावे (वैभव तत्त्ववाद‌ी) आणि अश्विनी सारंग (पूजा सावंत) या दोघांच्या भोवती फिरते. घरच्यांनच्या आग्राहाखातीर वैभवने तब्बल पस्तीसेक कांद्यापोह्याचे कार्यक्रम केले. बरं त्यात अश्विनी सारंगला सुद्धा तो नाकारतो. पहिल्यांदा पाहिल्यावर वैभवला पूजा काहीशी धांदरट, घाबरलेली-बावरलेली वाटली म्हणून तो तिला नाकारतो. बाकीच्या मुलींप्रमाणे तो तिला विसरून देखील जातो. कामानिमित्ताने पुण्याहून गोव्याला जात असलेले हे दोघं कळत नकळतपणे पुन्हा भेटतात. आणि ख-या अर्थाने सिनेमाच्या कथेला सुरूवात होते.

वैभव आणि पूजा ही जोडी नेहमीच त्याच्या कलाकृतीतून प्रेक्षकांवर भुरळ पाडते. शांत, सरळ स्वभावाचा वैभव आणि गडबड गोंधळलेली, चंचल स्वाभावाची पूजा या दोघांनी त्यांची कामगिरी त्या त्या पद्धतीने उत्तम केली आहे, अगदी त्याच्या भूमिकेला साजेशी अशी. काही वेळा पूजाची भूमिका फार अतिरेकी वाटू लागते. बहूदा तिच्या भूमिकेची ती गरज असावी. पहिल्या हाफनंतर दुसरा हाफ कुठेतरी रेंगाळल्यासारखा वाटू लागतो. प्रवासात भेटलेली ही दोघं नको त्या पेचात अडकत जातात. अचानक वैभवला पूजा आवडायला लागते. पण पूजा ही गोष्ट कळायला जो काही थाट दिग्दर्शकाने घातला आहे, त्यामुळे सिनेमा लांबणीवर गेला आहे. एका चांगल्या फुललेल्या प्रेमकथेला उगाचच कंटाळा येऊ लागतो.

सिनेमात एकूण ५ गाणी आहे. या सर्व गीतांना स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, निखील मोदगी आणि सिद्धार्थ महादेवन यांचा आवाज लाभला आहे. सिनेमा तांत्रिकदृष्ट्या उत्तम झाला आहे. छायाचित्रण थोडं अजून चांगलं झालं असतं. परंतु सिनेमाचं प्रमोशन, त्याच्या मार्केटिंगवर थोडं अजून भर दिला असता तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास अधिक मदत झाली असती. कथा-पटकथा थोडी अजून घट्ट झाली असती तर नक्कीच ‘जब वी मेट’ सारखा लूक आला असता.

वाईट मार्केटिंग धोरणांमुळे ‘भेटली तू पुन्हा’ ची सुपर स्टारकास्ट असूनही तितक्या चांगल्या पध्दतीने चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले नाही. चित्रपटाच्या प्रमोटर्सनी मीडियाचा प्रभाव समजला पाहिजे, निदान याचा जरी विचार केला पाहिजे की निर्मात्यांनी मोठ्या विश्वासाने आपल्यावर एक जबाबदारी सोपवली आहे आणि ती जबाबदारी संपूर्ण सामर्थ्याने पेलायला हवी. चित्रपटाला प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्याची प्रचंड क्षमता होती परंतु तसे काही घडले नाही.

ही एक भितीदायक बाब आहे की वाईट मार्केटिंगमुळे चांगल्या मार्केटिंग आणि विक्रीची कला ज्याचे नेहमीच ग्राहकांनी कौतुक केले आहे ते काही दिवसांनंतर दिसेनाशी होईल.