Review: नात्यांमधील प्रॉब्लेमचं सुंदर सोल्युशन – 'मला काही प्रॉब्लेम नाही'

 


नात्यांना अनुसरून यापूर्वी देखील मराठीत अनेक सिनेमे आले. प्रत्येक नातं हे किती महत्त्वाचं आहे आणि ते कसं जपलं पाहिजे हे त्या त्या सिनेमातून सगळ्यांनी शिकलंही असेल. नातेसंबंधाची अडकलेली गुंतवणूक सोडवणारा ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा चित्रपटात अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता गश्मीर महाजनी यांचा सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे.      

ही कथा आहे एका दांपत्याची म्हणजे केतकी (स्पृहा जोशी) आणि अजय (गश्मीर महाजनी). पूर्वी किती छान असायचं नाही सगळंच! पण सध्याच्या ह्या मॉर्डन युगात सगळं कसं फास्ट फास्ट होऊ लागलय. मग ते लग्न असो वा घटस्फोट. कोकणातून आणि नागपूरमधून आलेले केतकी आणि अजय हे दोघंही मुंबईत त्याचं शिक्षण संपवून नोकरी, व्यवसाय करत असतात. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. ज्यावेळी घरी सांगायची वेळ येते तेव्हा घरचे विरोध करतात. मग मुंबईत मित्र सागर(विनोद लव्हेकर) आणि मामा (कमलेश सावंत) यांच्या समवेत ते दोघं लग्न करतात आणि मुंबईत स्थायिक होतात. त्यानंतर हळूहळू सगळं बदलत जातं. दोघांचे तिघं होतात, पण त्यांच्यातलं प्रेम कुठे तरी कमी कमी होत जाताना दाखवलं आहे. रोजाच्या धावत्या रूटिंगमधून ते एकमेकांना वेळ द्यायला विसरू लागतात. असं म्हणा की ते एकमेकांना गृहीत धरायला लागतात. राग, द्वेष, मतभेद, चिडचिड आणि नात्यात आलेले प्रॉब्लेम हे यातून मांडण्यात आले आहे. अचानक या नात्याला वेगळं वळण येतं. आता हे वळण नक्की काय आहे यासाठी सिनेमा नक्की पाहा. केतकी आणि अजयच्या आयुष्यात आलेले प्रॉब्लेम सुटतात की नाही? त्यांना नक्की काय करायचय याच उत्तर मिळतं की नाही? हे सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला तुमचं नक्की कळेल.

मुळात नात्यांकडे त्यांना गृहीत न धरता नीट बघितलं तर सगळ्यात जास्त आनंद आणि प्रेम तिथेच मिळेल. आयुष्यातले सुंदर क्षण तुमच्या कुटुंबाबरोबर जगलात तर जगण्याला एक वेगळीच गम्मत येते हे या सिनेमातून पाहायला मिळते. ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ ह्या सिनेमाची कथा आजच्या पिढीची आहे. समोरासमोर बसून, एकमेकांना विश्वासात घेऊन आणि मनमोकळा संवाद साधून हे प्रश्न सुटू शकतात हे यातून सांगितले आहे. प्रत्येकालाच आपले आयुष्य रटाळ किंवा नीरस वाटते, पण तसे नाही. तुम्ही रोजच्या जगण्यातील छोटय़ा-मोठय़ा गोष्टींमधून आनंद घेतला, कुटुंबातील नाती जपण्याचा प्रयत्न केला तर आहे ते आयुष्यही सुखी आणि आनंदी असल्याचे तुम्हाला जाणवेल. आपण नेहमी समोरच्याकडे पाहतो, पण स्वत:कडे, कुटुंबाकडे पाहायला आपल्याला वेळ नसतो. काही प्रश्न किंवा अडचणी उद्भवल्या तर ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ म्हणत त्याकडे दुर्लक्ष करतो. पण असे बोलत आपण स्वत:लाच फसवत असतो. या लहान-सहान वाटणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच तोडगा काढला नाही तर त्या नात्याची तुटण्याचीच शक्यता जास्त असते.

'मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या सिनेमात एकूण ४ गाणी आहे. संगीत दिग्दर्शक हृषीकेश-सौरभ आणि जसराजनी, गीतकार गुरु ठाकूर लिखित "तुका साद तुझ्या माहेरची वाट देता गो" आणि "विरल्या केव्हा हळुवार ह्या भावना" तर वैभव जोशी लिखित "मौनातूनी ही वाट चालली पुढे" आणि "तुझ्यासाठी आता असणेही, नसणेही तुझ्यासाठी" अशी गाणी संगीतबद्ध केलेली आहेत.

सिनेमातील कलाकारांचे अभिनय पाहण्यासारखे आहे. स्पृहा आणि गश्मीर ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना आवडेल अशी आहे. दिग्दर्शक समीर विध्वंस यांच्या मांडणीला दाद देण्यासारखा हा सिनेमा आहे. कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी मनमोकळा संवाद सुरू झाला तर सध्या भेडसावणारे अनेक प्रश्न सहज सुटतीलच हेच या सिनेमातून साध्या, सरळ रूपात मांडण्यात आले आहे. सिनेमा पाहताना प्रत्येकजण यात स्वत:ला बघेल एवढं नक्की.