Review: असामान्य प्रेमाची गोष्ट सांगणारा 'अनान'

 


साधे, सरळ प्रेमकहाणीवर आधारित खूप सिनेमे येतात आणि या अगोदर देखील आले आहे. मात्र असामान्य विषयावर काम करण्याचं धाडस खूप कमी लोकं करतात. असेच एक नवीन शिवधनुष्य पेललं आहे राजेश कुष्टे यांनी. नुकताच या आठवड्यात प्रार्थना बेहरेचा वेगळा लूक असलेला अनान हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. द्विलिंगी असलेल्या व्यक्तीरेखेवर आधारित हा सिनेमा आहे.  

समाजात काही व्यक्ती द्विलिंगी जन्माला येतात. समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा फार वेगळा असतो. समाजाचं काय घेऊन बसता कधी कधी घरातील माणसाचा दृष्टीकोन देखील बदलतो. ही कथा आहे (नील) प्रार्थना बेहरेची. जन्मत: द्विलिंगी असलेल्या नीलला तिचे वडिल मारण्याचा प्रयत्न करतात म्हणून तिची आई तिला घेऊन पळत सुटते आणि एका मंदिराजवळ सोडून देते. नंतर तिला शिल्पा तुळसकर पूर्णत: सांभाळण्याची जबाबदारी घेते. त्यानंतर तिचा खडतर प्रवास चालू होतो. सिनेमा पूर्णत तिच्याभोवती फिरताना दाखवला आहे. कलेची आणि शास्त्रीय नृत्याची तसेच पौराणिक प्रतीकाची पार्श्वभूमी असलेला हा सिनेमा तितका फुलला नाही.  

"अनान" या नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावरील सिनेमाच्या कथेच्या हाताळणीत मात्र अशा अनेक अनावश्यक आणि अतार्किक गोष्टींचा अति भरणा झालेला आहे. जी पात्रे आहेत ती सगळी एकसुरी आहेत. एकतर खूप समंजस, रडकी किंवा संतापी. सिनेमात गोष्टी सोपे करणे आवश्यक असते. पण किती? सिनेमा हे दृश्य माध्यम असूनही या सिनेमात सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि दिग्दर्शकही सिनेमातून गोष्टी दाखवण्याऐवजी सांगण्यावरच भर देतो. तांत्रिक बाबतीत नृत्य सोडल्यास फारशा जमेच्या बाजू नाहीत. छायाचित्रण असं म्हणाल की एकतर पूर्ण चकचकीत प्रकाश नाही तर पूर्ण काळोख.

या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला लाभलेल्या सौरभ – दुर्गेश ह्या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेल्या 'गंधी सुगंधी', 'एक सूर्य तू', 'काहे तू प्रित जगायी'  यांसारख्या गाण्यांना सोनू निगम, आनंदी जोशी, रवींद्र साठे व सौरभ शेट्ये यांनी मधुर स्वरांनी साद घातला आहे.

सिनेमातील कलाकारांची कामगिरी तशी बरी आहे पण जर प्रार्थना ला वेगळ्या रूपात पहिल्यादाच पाहत असाल तर तो पाहण्यासारखा आहे. एका वेगळ्याच धाटणीच्या सिनेमातून ती प्रेक्षकांना तिच्या अभिनयाची भुरळ पाडणार आहे.