Review: जुन्या नात्यांचा नव्याने शोध घेणारा – बापजन्म

 


मराठी भाषेत प्रचलित असलेल्या ‘बापजन्म’ या शब्दावर आधारित सिनेमा तयार होणे ही खरंच मोठी बाब आहे. ‘बापजन्म’ या शब्दाचा अर्थ जरी आपल्या माहित असला तरी देखील या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर बाप आणि मुलांच्या हळव्या नात्याचा विषय फारच इंटरेस्टींग पद्धतीने या सिनेमातून मांडण्यात आला आहे.

सिनेमाचा विषय पाहता असा सिनेमा तुम्ही याआधी कधी बघितलाही नसेल किंवा एखादा बाप आपल्या मुलांच्या प्रेमापोटी असं काही करेल याचा विचारही केला नसेल, इतका मनाला चटका लावून ही कथा उलगडली आहे.  निपुण धर्माधिकारी या कलाकाराचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा जरी असला तरी तो या क्षेत्रात चांगलाच मुरलेला कलाकार आहे, हे या सिनेमातून सिद्ध होत आहे.  

ही कथा आहे भास्कर पंडीत आणि त्याच्या दोन मुलांची. पाच वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचं म्हणजे रजनीचं निधन झालेलं आहे. आता ते पुण्यात त्यांचा कुत्रा टायगर आणि नोकर माऊली बरोबर  राहतात. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी बंगळुरूमध्ये तर मुलगा परदेशात लंडनला असतो. दोघांचाही बापावर खूप राग आहे. भास्कर पंडित यांनी एक गोष्ट त्यांच्या पत्नी आणि मुलांपासून लपवून ठेवलेली होती आणि त्याच गोष्टीमुळे त्यांच्या मुलांमध्ये त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यांना बापाचं तोंडही बघायची इच्छा नाहीये.

दुसरीकडे भास्कर पंडित आपले एक साचेबद्ध आणि शिस्तबद्ध आयुष्य जगत आहेत. सकाळी बरोबर ५.३० वाजता उठायचे, लिंबू घालून गरम पाणी प्यायचे, एक तासभर जॉगिंग करायचे आणि घरी परतायचे. त्यानंतर ते आपल्या दैनंदिनीमध्ये लिहितात, एक्स-बॉक्सवर ‘कॉल ऑफ डूटी’ खेळतात किंवा मग आपटे या शेजाऱ्याची विचारपूस करतात. आपटे हे त्यांच्यासारखेच एकटे आयुष्य जगात आहेत. एकच फरक म्हणजे आपटे यांना अल्झायमरने ग्रासले आहे. भास्कर हे केवळ त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्या शेजारी बसतात. दोघे एकही शब्द बोलत नाहीत, कारण आपटे यांना शब्दच आठवत नाहीत तर भास्कर यांच्याकडे काही बोलण्यासारखे नाही. ज्या दिवशी भास्कर यांना आपल्या आयुष्याचा अंत कळतो त्या दिवशी ते त्याबद्दल दैनंदिनीत लिहून ठेवतात. ती बंद करायला जातात तेव्हा त्यांचे लक्ष दैनंदिनीतील आदल्या दिवसाच्या नोंदीवर जाते. मग त्याच्या आदल्या दिवसाची नोंद आणि मग त्याच्या आदल्या दिवसाची नोंद....असे करत ते पूर्ण एक वर्ष मागे जातात. त्यांच्या ध्यानात येते की, गेले संपूर्ण एक वर्ष ते एकच आयुष्य जगत आहेत!

मग ते हा सर्व मामला स्वतःच्या पद्धतीने हाताळण्याचे ठरवतात. माऊलीच्या माध्यमातून मग ते आपल्या मुलांना भेटण्यासाठी एक युक्ती करतात आणि त्यानिमित्ताने का होईना त्यांची मुलं त्यांना भेटण्यासाठी घरी येतात. त्यानंतर जी युक्ती त्यांनी वापरली असते ती नक्की काय आहे यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.

या सिनेमात मोजकीच म्हणजे अगदी हातावर मोजण्या इतकी पात्रे आहेत. यात सर्वात महत्वाची भूमिका ही सचिन खेडेकर यांनी वदवली आहे. सचिन खेडेकर हे भास्कर पंडीतची भूमिका अक्षरश: जगले आहेत. त्यांच्यानंतर दुसरी भूमिका जर कोणी खाल्ली असेल तर ती पुष्कराज चिरपुटकर याने. त्यांच्यासोबतच शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि अकर्श खुराणा यांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका चोख साकारल्या आहेत. 

दिग्दर्शन, लेखन, अभिनय, संगीत, छायाचित्रण, संकलन या सर्वच पातळीवर हा सिनेमा अतिशय उत्तम पद्धतीने मनोरंजन करतो. यासोबतच कथा सांगण्याची निपुणची जी स्टाईल आहे ती या सिनेमाचं खास आकर्षण ठरते. त्यामुळे हा सिनेमा सर्वांनी आवर्जुन नक्कीच पाहावा