Review: खिळखिळून मेंटल करेल असा ‘शेंटिमेंटल’

 


मराठीत आजवर अनेक कॉमेडी सिनेमे आले. पण त्या प्रत्येकाचा मूळ गाभा वेगळा होता. असाच अजून एक कॉमेडी सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. समीर पाटील लिखित दिग्दर्शित ‘शेंटिमेंटल’ ह्या सिनेमातून पोलिसांमधील माणसाची गोष्ट भन्नाट विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे.

ही कथा आहे खाकी वर्दीतील पोलिसांची. सिस्टीमच्या अंडर काम करणं हेच त्याचं आयुष्य, मग ते प्रामाणिकपणे असो वा कोणा मोठ्यांच्या दबावाखाली. हलत डुलत चालू असलेल्या कामात अचानक वरिष्ठ पाहणीसाठी येतात आणि पूर्ण समिकरणच बदलून जातात. बरं काम छोट्यांनी करायचं आणि मेवा मात्र मोठ्यांनी खायचा, हा जगाचा नियमच आहे असं म्हणायला हरकत नाही. (अशोक सराफ) – प्रल्हाद घोडके, (उपेंद्र लिमये) - दिलीप ठाकूर, (विकास पाटील) - सुभाष जाधव, (पल्लवी पाटील) - सुनंदा साळोखे, (सुयोग गोऱ्हे) - मनोज पांडे यांच्याभोवती हा सिनेमा फिरतो. वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्या ऑपरेशनवर काम करायला सुरवात करतो. अशोक मामा, उपेंद्र लिमये, विकास पाटील हे तिघं त्या केसचा छडा लावण्यात स्वत:ला झोकून देतात. दिवस रात्र, काळ वेळ न पाहता पोलिस ऑन डूटी आपलं काम करतच असतात. या ऑपरेशन दरम्यान त्यांना बिहारला जावं लागतं. त्या प्रवासामधील धमाल, मस्ती तुम्हा खळखळून हसायला भाग पाडेल अशी आहे. बिहारला जाऊन ते ऑपरेशन सक्सेसफूल होतं का? चोर बिहारमधून पळून जातो का? नक्की त्या चोराने हे सगळं का केलं असेल त्याचं उत्तर त्यांना सापडतं का?   यासाठी सिनेमा पाहायला नक्की जा.

१९७५ मध्ये अशोक मामांच्या करियरची सुरुवात ‘पांडू हवालदार’ या सिनेमाने झाली होती. त्यात त्यांची हवालदारची भूमिका खूप गाजली होती आणि आज ४२ वर्षानंतर या सिनेमात देखील ते हवालदारच्या, किंबहुना हवालदाराच्या भूमिकेतून बढती घेऊन सहाय्यक पोलीस उप निरीक्षक ह्या भूमिकेतून प्रेक्षकांना खिळवून ठेवणार एवढं नक्की. अशोक मामांचा अभिनय आणि संवाद शैलीतील‘अचूक टायमिंग’ याला संपूर्ण मराठी सिनेसृष्टीत तोड नाही. सिनेमातील बाकी कलाकार यांचे अभिनय देखील मजेशीर आहे. विषय कितीही गंभीर असला तरी त्यावर मनोरंजक पद्धतीने भाष्य करत अंतर्मुख व्हायला लावणे ही समीर पाटील यांची खासियत आहे, त्यामुळे तो पाहताना तुम्हाला कुठे कंटाळा येणार नाही, एवढं खरं. हा पण जसा पहिला हाफ प्रेक्षकांना बांधून ठेवतो तसा दुसरा थोडा रेगाळतो देखील.

पोलिसांच्या बाबतीतला मान हा लोकांच्या मनातून कुठेतरी कमी कमी होताना दिसत आहे. ह्या सिनेमातून पोलिसांची व्यथा, त्यांची जीवन पद्धती, त्याचं राहणीमान एका मनोरंजन पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न समीर पाटील यांनी केला आहे. परंतु सिनेमाचं प्रमोशन, त्याच्या मार्केटिंगवर थोडं अजून भर दिला असता तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास अधिक मदत झाली असती.