Review: विवाहित जोडप्यांचा लग्नानंतरचा बदलत जाणारा स्वभाव ‘तुला कळणार नाही’

 


दर शुक्रवारी आता एक तरी मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आणि या आठवड्यात प्रदर्शित झालाय स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित ‘तुला कळणार नाही’ हा चित्रपट. काही चित्रपट प्रेक्षक कलाकार कोण आहेत ते पाहतात तर काहीजण दिग्दर्शन कोणी केलंय हे पाहतात. परंतू ‘तुला कळणार नाही’ हा असा चित्रपट आहे ज्याला कलाकार आणि दिग्दर्शक म्हणून प्रेक्षक प्राधान्य देईल.

मितवा, लाल इश्क, फुगे या चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर स्वप्ना वाघमारे जोशी यांनी ‘तुला कळणार नाही’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करुन नवरा-बायको या नात्याचे एक चित्र प्रेक्षकांसमोर तयार केले आहे.

‘तुला कळणार नाही’ चित्रपटाची कथा आहे राहूल आणि अंजली या एका विवाहित जोडप्याची. लग्नाच्या आधी माणसाचा स्वभाव कसा असतो आणि नंतर तो कसा बदलतो आणि त्यामुळे रोज-रोजचे होणारे वाद-विवाद या गोष्टी चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत. लग्नानंतर एकमेकांचा खुपणारा स्वभाव असूनही ते मुंबई-गोवा-नागपूर प्रवास एकत्र का करतात आणि कसं करतात आणि प्रवासा दरम्यान एकमेकांना मारले जाणारे टोमणे हे सर्व बघणं मजेशीर आहे. याच प्रवासात त्यांना सोबत मिळते मेनकाची (निथा शेट्टी) आणि मेनकासोबतचा प्रवास कुठपर्यंत जाऊन पोहचतो हे पाहणं देखील मनोरंजक आहे. या चित्रपटात जरी राहूल आणि अंजली यांची लग्नानंतरची कथा किंवा प्रेमकथी असली तरी यामध्ये आणखी दोन सुंदर प्रेमकथा आहेत आणि ते नेमके काय आहे हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल.

सध्याच्या परिस्थितीत प्रेक्षकांना कलाकारांपेक्षा चित्रपटाचा आशय महत्त्वाचा वाटतो आणि या चित्रपटाची कथा एका विशिष्ट वयोगटाच्या अपेक्षा पूर्ण करतील. नवरा-बायको आणि त्यांचा बदलत जाणारा स्वभाव याआधीच्या चित्रपटात आपण अनेकदा पाहिलंय. कथेत नाविन्य नाही पण मांडणी ब-यापैकी आहे. ‘इरादा पक्का’ या चित्रपटानंतर सोनाली कुलकर्णीने पुन्हा एकदा मजेशीर-बालिश-खट्याळ बायकोची भूमिका साकारली आहे; जी अर्थात अनेकांना आवडेल.  सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी ही जोडी पहिल्यांदाच दिसत असल्यामुळे त्यांची केमिस्ट्री नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल. त्यांच्यासह अभिनेता सुशांत शेलार आणि अभिनेत्री निथा शेट्टी यांचा देखील अभिनय छान जमला आहे. चित्रपटात आणखी तीन सर्वांचे आवडते कलाकार आहेत आणि हे सरप्राईज तुम्हांला चित्रपटातच पाहायला मिळेल. चित्रपटाच्या पहिल्या भागाला कथेशी बांधून ठेवण्यात जरी यश मिळाले तरी दुसरा भाग खेचला गेला आहे असं वाटतं. पण ‘शेवट चुकवू नका’ हे वाक्य या चित्रपटाला लागू होत. असा हा साधा, सुंदर, गोड चित्रपट विवाहित जोडपे जास्त एन्जॉय करतील आणि एक समंजसपणा, एक संदेश स्वत:सोबत घेऊन जातील असं वाटतं.

या चित्रपटात ‘तुला कळणार नाही’, ‘मिठीत ये’, ‘माझा होशील का’ अशी एकूण तीन गाणी आहेत. स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांच्या आवाजातील ‘तुला कळणार नाही’ हे शीर्षक गाणं राहूल-अंजलीच्या भावनांना सुंदरपध्दतीने जोडलं गेलं आहे. स्वप्ना वाघमारे जोशी तर त्यांच्या दिग्दर्शनातून नेहमीच कमाल करतात आणि यावेळी त्यांनी सुंदर कलाकृती तयार केली आहे.

विवाहित जोडपे या चित्रपटाला प्राधान्य देतीलच पण इतर व्यक्तिंनी पण हा चित्रपट पाहण्यास काही हरकत नाही कारण तुमच्याही आयुष्यात ‘लग्न’ ही पायरी येणार आणि तेव्हा ‘तुला कळणार नाही’.