सस्पेन्स, थरारक आणि साहसी – फास्टर फेणे.

 


भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेला आपल्याच मातीतला, आपल्यातलाच एक सामान्य पण असामान्य व्यक्तिमत्वचा, हुशार आणि चौकस मुलगा, अवघ्या महाराष्ट्राचा लाडका 'फास्टर फेणे' येत्या २७ ऑक्टोबरला म्हणजेच या आठवड्यात रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला.

चित्रपटाची कथा आहे बनेश्वरवरून पुण्यात मेडिकलची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका जिज्ञासू, चिकाटी आणि उत्साही मुलाची म्हणजेच बनेश फेणेची. पक्षीमित्र, निसर्गप्रेमी, टेक्नॉलॉजिचा चाहता आणि सायकलपटू असलेला बनेश पुण्यात येतो. तिकडे आल्यानंतर तेव्हा त्याला त्याची बालमैत्रीण आणि आता पत्रकार असलेल्या अबोलीशी त्याची गाठभेट होते. पुण्यात ज्या लेखकांच्या घरी बनेश राहणार असतो तिकडे चोरी होते आणि त्या चोरीच्या शोधात त्याची लहान मुलगा भू-भू बरोबर मैत्री जमते.

बनेश परीक्षेच्या तयारीला लागतो. परीक्षा केंद्रावर त्याची धनेश लांजेकर नावाच्या एका चुणचुणीत आणि हुशार मुलाशी ओळख होते. पाच मिनिटाच्या भेटीत बनेशचा त्याच्याशी संवाद होतो आणि ते दोघे परीक्षा वर्गात निघून जातात. परीक्षा झाल्यानंतर तो त्याला भेटण्याचा प्रयत्न करतो पण तसं होत नाही. परत निघालेल्या बनेशला अचानक एक गोष्ट हादरवून सोडते आणि ती गुंतागुंत सोडवण्यासाठी बनेश सज्ज होतो. शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आणि सर्वसामान्य माणसाच्या आकलनापलीकडे असणारा निगरगट्ट वृत्तीचा अप्पा; सत्य शोधून काढल्याशिवाय चैन न पडणाऱ्या आणि संकटांना बेधडकपणे सामोरं जाणाऱ्या फेणेसमोर आव्हान म्हणून उभा ठाकतो. या जीवघेण्या शोधात फेणे यशस्वी होतो का याबद्दलचा उत्कंठावर्धक प्रवास या सिनेमामधून पाहायला मिळणार आहे. नक्की आता अप्पाचा या घटनेशी काय संबंध असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? पण त्यासाठी तुम्हाला सिनेमा सिनेमागृहात जाऊनच पाहावा लागेल.

या सिनेमात अमेय वाघ, गिरीश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, पर्ण पेठे, शुभम मोरे, ओम भुतकर, अंशुमन जोशी, श्रीकांत यादव आणि चिन्मयी सुमीत अशी कलाकारांची मांदियाळी आहे. पण फेणे आणि अप्पा म्हणजेच अमेय वाघ आणि गिरीश कुलकर्णी या दोघांचाही अभिनय पाहण्यासारखा आहे.

कथा, पटकथा आणि संवाद या माध्यमातून भा. रा. भागवतांचा सत्तर-ऐंशीच्या दशकातला फास्टर फेणे क्षितिज पटवर्धन यांनी आजच्या काळात आणला आहे. वेग आणि थरार असलेल्या ह्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमाचं शूटिंग तब्बल साठ वेगवेगळ्या लोकेशन्सवर पार पाडलेलं होतं. ड्रोन कॅमेराचा वापर देखील चांगल्या पद्धतीने केला आहे त्यामुळे वेगवेगळे लोकेशन्स पाहायला सुंदर वाटतय.

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित, झी स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित व क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून साकारलेला फास्टर फेणे हा सिनेमा प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे सिनेमागृहात जाऊनच सिनेमा बघा.